हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, २९ एप्रिल, २०१२

देव झाला दानव


सचिन ला देव मानणारे अचानक त्याने खासदारकी स्वीकारली म्हणून दानव समजू लागले आहेत, इंटर नेट वर त्याला शिव्याची लाखोली वाहिली जात आहे.
जणू काही त्याने निशाने पाकिस्तान स्वीकारले आहे असा गजहब करण्यात येत आहे. पूर्वी हा देव मातोश्री वर दर्शन द्यायचा आता कृष्ण कुंज मध्ये त्यांचे बस्तान हलल्यामुळे अपेक्षित त्या प्रतिक्रिया राजकारणी मंडळींकडून आल्या. म्हणजे विरोध आणि समर्थन.



हातवाले सुद्धा ह्या देशाचे नागरिक आहेत. त्यांच्या पक्षात सुद्धा काही चांगले काही वाईट लोक आहेत जे सर्वच पक्षात असतात.
ह्याच लोकांनी सनदी नोकरांना सुद्धा खासदारकी दिली ,पद दिले.
निरुपम व नंदी ह्यांना उमदेद्वारी कोणी आणी का दिली हे सोयीस्कर रीत्या विसरले जाते. सचिन ने जर राजकारणात कारकीर्द करायची ठरवली तर त्याला अमक्या एका पक्षाने गृहीत का धरावे हेच कळत नाही.
मुळात क्रिकेट व्यतरीक्त तो सार्वजनिक जीवनात काय निर्णय घेतो. हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. त्याचा आजपर्यंत चा लौकिक पाहता तो ह्या संधीचा सुयोग्य वापर करेल असे मला वाटते.

हातवाल्यांनी एकेकाळी अमिताभ ला पक्षात घेतले होते. आणि नुकतेच स्वीडन च्या माजी पोलीस प्रमुखाच्या मुलाखतीमधून स्पष्ट झाले की कात्रोची सुटला आणी अमिताभ अडकला.
सचिन ला राजकारणाचीआणी राजकारणी मंडळींची नक्कीच कल्पना आहे. सर्व सामान्य माणसांपेक्षा त्यांची ह्या वर्तुळात देशातील एक प्रतिष्टीत व लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून उठबस आहे.

क्रिकेट मध्ये तरुण वयात उघड्या डोळ्याने अझर जडेजा ह्यांना पैशाच्या गंगेंत आंघोळ करतांना पाहून ह्याच्या तोंडाला पाणी सुटले नाही. त्याकाळात सुद्धा तो आपल्या परीने देशासाठी मैदानावर झुंजला. म्हणजे आपल्याच संघातून काही जणांनी माती खाल्ली आहे हे शल्य उरी बाळगून तो मैदानावर उतरला.
प्रामाणिकपणा व मध्यमवर्गीय संस्कार आयुष्यभर जपत करोडो भारतीयांचा तो देव झाला. आणी आज देवावर संशय आणी शिंतोडे उडवण्याचे घोर पातक काही तथाकथित विद्वान करत आहेत.
महापुरुषांचे पाय देखील मातीचे असतात. सर्वच पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी आपल्या सगळ्यांच्या देखत कधी ना कधी कोणत्यातरी मुद्यावर माती खाल्ली.
राजकारण केले.
सचिन ला एक संधी तर देऊन पहा.

त्याचा आजपर्यंत चा लौकिक पाहता त्याने काही ताळेबंद गृहीतके बांधून हा निर्णय घेतला असले. राजकारणात अनेक लोक पैसा आणि लोकप्रियतेची सत्तेची नशा मिळवण्यासाठी येतात. सचिन ला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे का ?

त्याने राजकारणातील ह्या संधीचा वापर केला आणी खेळाडूंची भूमिका,त्यांच्या समस्या आणि क्रीडे विषयी त्याची मते आणी योजना सभागृहात व्यवस्थित मांडल्या. तर अजून आपल्याला काय हवे.
आपल्याला काय हवे. राजीव शुक्ला किंवा मोदी ह्यांनी हातात फळी ,चेंडू काहीही न घेता क्रीडा विश्वात मुशाफिरगिरी केली. पण ह्या खेळाडूने राजकारणात डाव आजमावून पाहण्यास काय हरकत आहे.

३ टिप्पण्या :

  1. विक्रमादित्य सचिनला राज्यसभेचा खासदार म्हणून नामनियुक्त करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय आणि त्या निर्णयावर रबर स्टँप राष्ट्रपतींनी उठवलेला सहमतीचा शिक्का ह्या बातम्या काल दुपारपासून माध्यमांवर धुमाकुळ माजवत होत्या...सचिनने सकाळी काँग्रेसच्या तथाकथित त्यागमुर्ती सोनिया हिची भेट घेतली व त्यानंतर एकदम बोफोर्स घोटाळ्याच्या महत्वाच्या विषयाला व बातम्यांना बगल देत माध्यमांनी सरळ सरळ सचिनचा राजकारण प्रवेश या मथळ्याखाली बातम्या चालवण्यास सुरुवात केली...मती गुंग झाली होती हे सगळ बघून सचिनचा राग तर येत होताच पण त्याच बरोबरीने त्याची किव देखिल येत होती....पण त्याहीपेक्षा भारतीय जनता म्हणून आपण किती मुर्ख आहोत याचेच जास्त आश्चर्य आणि बरोबरीने वैषम्य देखिल वाटत होते.....काँग्रेसबद्दलच्या असलेल्या आत्यंतिक तिरस्काराची जागा सचिनबद्दलच्या उद्वेगाने घेतली होती..

    वैतागून दुरचित्रवाणीवर चाललेली ती माध्यमांची कलकल बंद केली आणि क्षणभरात निरव शांतता घरात पसरली....त्या शांत वातावरणाने माझ विचारचक्र पुन्हा कार्यरत झाल... पुर्वीचा काळ आठवला जेंव्हा देशात दुरचित्रवाणीच प्रस्थ इतक अवास्तव वाढ्ल नव्हत...शाळेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला वृत्तपत्रवाचन हे बंधनकाऱक होत....घरी सकाळच वृत्तपत्र वाचण्यासाठी माझी आणि तिर्थरुपांची चढाओढ आणि वादविवाद हे रोजचच चित्र होत ...राजकारण हा आवडीचा विषय ..वडीलांशी रोजच्या घडामोडींवर चर्चा हा अत्यंत प्रिय कार्यक्रम...त्या होणार्‍या चर्चेतून स्वत:ची ठाम मते बनत गेली..कधी कधी तिर्थरुपांनी एखादा विषय निट मांडून सांगितला की त्या विषयावर खोलात जाऊन विचार करण्याची वृत्ती वाढीस लागली....आणि मग त्या वैचारिक मंथनातून आपल्या ठाम आणि टोकाच्या असलेल्या मतांमधे परिवर्तन करण्याची सवय देखिल जडून गेली.....पण आताचे चित्र पुर्णार्थाने बदललय ...आंतरजालावर या सगळ्या राज्यसभेच्या खासदारकीची पार्श्वभुमी अभ्यासल्यावर मी एका निष्कर्षाप्रत आले

    उत्तर द्याहटवा
  2. ..माध्यमांची आपापसातली जिवघेणी स्पर्धा इतकी विकोपाला गेली आहे की स्पर्धेत टिकून राहण्याचा अट्टाहास करताना आपण एखाद्या व्यक्तीचे विनाकारण चारित्र्यहनन करण्यास हातभार लावतोय याचे सारासार भान देखिल माध्यमे बाळगत नाहीत्...आता सचिनचेच उदाहरण घ्या...केंद्रातील काँग्रेसप्रणित युपिए सरकारने सचिनला राज्यसभेवर नामनियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवला....राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली ...मंजुरी न देतील तर काय? .....झाल .खरेतर अत्यंत सोपा विषय..

    पण माध्यमांनी या बातमीला वेगळ आणि निरर्थक वळण देत सचिनने जणू काही काँग्रेसपक्षात प्रवेश केल्याचे चित्र जनमानसापुढे उभे केले......देशात सध्या सुरु असलेल्या काँग्रेसच्या केंद्रातील युपिए सरकराचा अनागोंदी कारभार आणि लाखो करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या केंद्रस्थानी असलेल्या काँग्रेसपक्षाच्या वळचणीला जात नाकर्त्या आणि भ्रष्ट काँग्रेसशीच सचिनने हातमिळवणी केली असल्याचा संदेश देशभारत पोहोचला आणि सचिनवर अत्यंत खालच्या शब्दात व शेलक्या विशेषणांनी सोशल मिडियामधे सचिनची बदनामी सुरु झाली....सचिनने काँग्रेसच्या सरकारचा हा प्रस्ताव स्विकारला म्हणजेच नकळतपणे सचिन भ्रष्टाचाराची गंगोत्री असलेल्या काँग्रेसच्या बरोबर असल्याचा आभास निर्माण केला गेला...आणि याचाच परिणाम म्हणून मागे फेरारीवर करसवलत मिळावी म्हणुन सचिनने केलेला अर्ज आणि मुंबईत नविन घर बांधताना अधिक चौरसफुट जागेची केलेली मागणी ,तसेच तो केवळ विश्वविक्रमासाठी व पैशासाठीच खेळतो....अश्या प्रकारचे विषय उकरुन काढून सचिनची निंदानालस्ती केली जाऊ लागलीय...ट्विटरवर तर सचिनच्या चाहत्यांच्या आणि त्याला फॉलो करणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली..२तासामधे जवळपास १,००,००० ने हि संख्या घटत होती...
    या सगळ्या प्रकरणात सचिनचा निव्वळ आणि केवळ सन्मान करण्याची काँग्रेसची भावना आहे असे मानणे मुर्खपणाचे ठरेल...पुढिल वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन खेळली गेलेली हि एक चाल आहे ..तसे देखिल महाराष्ट्रातल्या जनतेचा अभिमान हा कुणी कधीही आणि कसाही डिवचू शकतो व समजा त्या महाराष्ट्रीय अभिमानाचा नव्हे तर दुराभिमानाचा फायदाच करुन घ्यायचा ठरवले तर मग मराठी व्यक्तीला राष्ट्रपतीपदासाठी उभे करुन मराठी माणसाच्या अभिमानाला फुंकर घालून मग सेनेसारख्या पक्षांना मुर्ख देखिल बनवता येते...राष्ट्रपती प्रतिभा पाटील या किती प्रतिभावान आहेत हे आपण बघतोच आहोत...प्रतिभा पाटील निव्वळ मराठी आहेत म्हणुन त्यांचा अभिमान बाळगावा अशी त्यांची कारकिर्द आहे का? हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ मराठीचा सार्थ अभिमान बाळगणार्‍या व्यक्तीने स्वत:ला प्रामाणिकपणे विचारावा.. उलट प्रतिभा पाटील या मराठी आहेत याची लाज वाटेल अशी परिस्थिती आहे...सचिनला जे राज्यसभेच खासदारपद मिळालय ते सरकारने दिलेल आहे काँग्रेसपक्षाकडून सचिन राज्यसभेवर पाठवण्यात आलेल नाही याची नोंद घेणे गरजेचे आहे.....उत्तरप्रदेश ,पंजाब्,गोवा,,बिहार या सगळ्या राज्यांतील काँग्रेसचे झालेल पानिपत बघुन काँग्रेसचे टिनपाट युवराज राहुल गांधी यांच्यासाठी महाराष्ट्रात अनुकुल वातावरण तयार करण्यासाठी सचिन सारख्याचा वापर केला गेला हे निर्विवाद सत्य आहे...गरज आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेने जाग राहण्याची आणि येत्या निवडणु़कीत काँग्रेस आघाडीला मतपेटीतून पार उताणे पाडण्याची ....

    उत्तर द्याहटवा
  3. सचिन वर डाव लावून त्याच्या प्रसिद्धीचा स्वत:साठी सवंग वापर करुन घेण्याची खेळी कुणाची असावी ?काही अंदाज बांधता येतोय का?नसेल तर मला जितक समजतय त्यावरुन मी इतक जरुर सांगू शकते हि खेळी खेळण्यामागच डोक ज्या शकुनीमामाच आहे त्याच नाव सर्वश्रुत आहे आणि तो शकुनीमामा दुसर तिसर कुणीही नसून शरद पवार हेच आहेत्...यात इतर भुमिका वठवणार्‍या व्यक्ती आहेत मुकेश अंबानी,आणि काँग्रेसचे चाटुकार राजिव शुक्ला......गांधी घराण्याचे भ्रष्टाचाराचे कारनामे हळू हळू बाहेर येत आहेत्..काँग्रेसने तर या देशात अक्षरश: लूट माजवली आहे ..आणि त्याचाच परिणाम म्हणुन निव्वळ जनतेची या महत्वाच्या विषयांवरुन लक्ष उडवण्याच्या हेतूने माध्यमांना हाताशी धरत सुरु असलेला हा सचिन संदर्भातला अपप्रचार आहे..
    सध्या काँग्रेसचे खोल खोल गर्तेत रुतत चाललेले जहाज सचिनरुपी नांगराचा वापर करुन वाचवण्याचे हे खरेतर काँग्रेसचे निरर्थक प्रयत्न आहेत...श्रीकृष्णाने शिशुपालाचे देखिल ९९ अपराध पोटात घातले होते पण शंभराव्या अपराधानंतर श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राने शिशुपालाचा मस्तकाचा वेध घेतलाच होता....काँग्रेसने हे विसरता कामा नये......
    यापुर्वी सांस्कृतीक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी राज्यसभेच खासदारपद भुषवलय यात स्वरकोकीळा लताजी,शबाना आजमी.मैथिली शरण गुप्ता ,पृथ्वीराज कपुर,जी रामचंद्रन,वैजयंतीमाला यासारख्यांची वर्णी लागते.क्रिडाक्षेत्रातला असा सचिन हा पहिलाच सदस्य नव्हे या आधी दिलीप तर्की ,दारासिंह यांची देखिल नामनियुक्त सदस्य म्हणून वर्णी लागली आहेच फक्त क्रिकेटच्या क्षेत्रातील सचिन हा प्रथम खेळाडू आहे इतकच......या वर नमुद केलेल्या नामनियुक्त सदस्यांपैकी पैकी किती जणांनी अधिकृतरित्या काँग्रेसपक्षात प्रवेश केलाय याचा विचार जरुर करावयास हवा....लतादीदींची तर जवळीक तेंव्हा देखिल हिंदुमहासभेशी आणि शिवसेनेशी होती आणि आजही आहे...सचिनला राज्यसभेची खासदारकी हि राष्ट्रपतींच्या कोट्यातून मिळाली आहे काँग्रेसकडुन नव्हे हे कृपया लक्षात घ्या....काँग्रेसच्या भुलथापांना आणि माध्यमांच्या गोबेल्स प्रचाराला जनतेने भिक घालता कामा नये...कारण यात नुकसान जनता म्हणुन आपलेच आहे.
    या प्रकरणावरुन एक मात्र निश्चित निष्कलंक सितेला देखिल एका परिटाच्या संशयामुळे अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि वनवास देखिल भोगावा लागला...सचिनचे देखिल तेच आहे..इतक्या लहान वयात सुरु केलेली आणि अथक प्रयत्न आणि परिश्रमाने यशाच्या शिखरावर नेलेली कारकिर्द केवळ या नीच काँग्रेस व माध्यमांमुळे धोक्यात आली आहे.....
    सचिन आपली ही नवी भुमिका कशी पार पाडतो ?हे बघणे औत्सुक्याचे असेलच .आपले वेगळेपण जपत खर्‍या अर्थाने या भुमिकेला सचिन एक नविन आयाम प्राप्त करुन देईल याबद्दल विश्वास वाटतो.... सचिनच्या स्थायी असलेल्या सजग वृत्तीमुळे तो या आपल्या नव्या भुमिकेला न्याय देत आपला ठसा प्रकर्षाने उमटवेल याची खात्री आहे...आणि असे घडले तर खर्‍या अर्थाने निदान मला आपण मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा सार्थ अभिमान वाटेल..
    सचिनच्या या नव्या इनिंग साठी हार्दिक शुभेच्छा....
    अतीअवांतर---प्रतिभा पाटील यांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या वेळेस मराठी म्हणुन समर्थन देणार्‍या शिवसेनेचा मराठीचा अभिमान सचिनच्या राज्यसभेच्या खासदारकीला विरोध करताना कुठे शेण खायला गेलाय?
    जय हिंद!
    जय महाराष्ट्र!

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips