हिमवर्षाव

Blogger Tricks

शुक्रवार, ४ मे, २०१२

माझी शाळा आणि एक मुक्त प्रकटन .

आज चेपू वर म्हणजे चेहरा पुस्तक वर आमची वर्गातील मैत्रीण दीपाली सिरपोतदार,जठार शाळेच्या बिल्ल्याचा फोटो टाकला 
 ( हिच्या आडनावाचा वर्गातील काहीजण सरपोतदार असा उच्चारीत.  ह्यावर तिचा
नेहमीच आक्षेप असायचा )   


. तो पाहून शाळेतील माझ्या अनेक सवंगड्यांनी भरभरून प्रतिसाद दिले. मीही दिला. पण माझे मन काळाचा पडदा ओलांडून  पार भूतकाळात गेले. आणी दिवसभर शाळेच्या आठवणी मनाशी पिंगा घालत होत्या. त्यातील बहुतेक शाळेच्या सहलीविषयी होत्या. शाळा ह्या सिनेमामुळे आजकाल अनेक जण आपल्या शाळेविषयी लिहिते होतात. मध्यल्या सुट्टीमुळे तर अनेकांना आपली शाळा टीवीवर पाहून आठवणी मनात दाटतात.
माझे हे प्रस्तुत प्रकटन म्हणजे ह्या आठवणींवर भाष्य आणि शाळेच्या सामाजिक स्वरूपाचा थोडक्यात आढावा आहे.  

माझी शाळा स्वामी विवेकानंद ( राणाप्रताप ) डोबीवली पश्चिम . ह्यात कंसातील राणाप्रताप  ह्या नावाला विशेष महत्व. म्हणजे डोंबिवलीत स्वामी च्या अजून बर्याच शाखा आहेत पण आमच्या शाखेचा रुबाब म्हटलं तर दरारा काही औरच होता. गिरवाव दादर मधून मध्यमवर्गीय मराठी माणूस ठाणे आणी डोंबिवली मध्ये स्थलांतरित झाला. आणी मुंबईतून खर्या अर्थाने ब्रेन ड्रेन सुरु झाले. डोंबिवली चा पांढरपेशा सुशिक्षित व सुसंस्कृत चेहरा आख्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे. ह्या विद्येच्या नगरी अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. पण मुंबईतील पार्ले टिळक , बालमोहन व ठाण्यातील सरस्वती ह्यांच्या तोडीस तोड डोंबिवलीत पूर्वेला माझ्या आईची शाळा टिळकनगर आणी दुसरी आमची राणाप्रताप होती. म्हणून आम्ही पूर्वेला स्थलांतरीत झालो आणी माझ्या घरासमोर स्वामी (रामनगर) होती तरी मी पलीकडे रोज ह्या शाळेत यायचो.

गुणवत्ता यादीत झळकणे हा आमच्या शाळेचा स्थायी भाव बनला होता. म्हणजे वर्षभर घोका आणी परीक्षेत ओका ह्या धाटणीच्या खेळामध्ये मी वाकबगार नव्हतो. किंबहुना ही मेकोलो च्या काळापासून असलेली परीक्षा पद्धत तुम्हाला विषयाचे कितपत आकलन झाले आहे ह्याचा खरा कस न लावू देता कोचिंग क्लास इयत्ता ५ वी पासून लावल्याने  जीवनाच्या आरश्यात विद्यार्थी नेहमीच स्वतःची भ्रामक चित्रे पाहतात. असे मला वाटते. शारीरिक शिक्षणाची  शाळेत आमची खूपच उपासमार झाली. पण ह्यात शाळेचा दोष नाहि . कश्यासाठी तर पोटासाठी हे ब्रीदवाक्य मानणाऱ्या मध्यमवर्गीय चाकरमान्यांची ही शाळा प्रतिनिधित्व करणारी होती.
पण मी त्याला सन्माननीय अपवाद होतो.

 लहानपणापासून व्रात्य ,खोडकर ,हूड ,मस्तीखोर ,खेळात हुशार आणी हजरजबाबी आणि विनोदी व एकंदरीत चुणचुणीत मुलगा होतो. अभ्यासातील हुशारी हा एक गुण वगळता बाकी एवढे सारे गुण माझ्यात होते. अभ्यासा बाबतीत माझी मते म्हणजे पोटापुरता करायचा एवढी होती. लहानपणापासून मला वाचनाचे व्यसन होते. व्यसन ह्यासाठी की माझ्या समोर आलेला कोणतेही पान मग ते कोणत्याही विषयाविषयी असो ते मी वाचून काढायचो. ह्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त जगाची माहिती मला नेहमीच असायची.


   आमची दुसरीत सागर ,महाजन ,मोरे , यशोधन आणी मी अशी गेंग होती. मी त्या काळात आमच्या गच्चीवर रॉबिन हूड सिनेमा पहिला होता. आणी त्यापासून स्फूर्ती घेऊन मी ही टोळी जमवली होती. माझ्या ह्या टोळी स्थापनेचा उद्देश मी एकदा अंतूलकर बाईंना सांगितला तेव्हा त्यांनी डोक्याला हात मारल्याचे स्पष्ट आठवते. मजा मस्ती आणि आमच्यालेखी दुर्जन व्यक्तींना चोप देणे आणि खेळांमध्ये हमखास बक्षिश मिळवणे असे करत आमचे सुखाचे दिवस चालले होते.
वर्गात सहल निघणार अशी बातमी पसरली की सर्वात आधी आमच्या कंपूचा उत्साह शेंपेन सारखा उसळत असे. वर्गातील सर्वात मस्तीखोर कंपू आम्ही आणी सहल म्हणजे फुल २ धमाल ह्याअर्थी सहलीचा सर्वात जास्त आनंद लुटणे हे आमचे नैतिक कर्तव्य असायचे. दुसरी मधील आमची सहल आठवते.
आम्ही पंचवार्षिक योजना राबवितात त्या धर्तीवर रोज वर्गात कोण कोण सहलीला काय काय आणणार म्हणजे चेंडू ,पोपिन्स  च्या गोळ्या ,श्रीखंडाच्या गोळ्या. राजगिर्याचे लाडू. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी घरून नगद रुपये आणायचे ठरविले.

 त्या काळात सहलीचे रुपांतर पिकनिक मध्ये न झाल्याने पैसे घरातून मिळवणे हे सरकार कडून एका कल्याणकारी योजनेला पैसे सुटण्या एवढे अवधड होते. पण एक महिना मी नियमित अभ्यास करेल असे हमीपत्र देऊन घरून पैसे मिळवले. मला शाळेच्या सहलीच्या आधीचा  दिवस विशेतः रात्र अजूनही आठवते. ह्या रात्री सहलीचे सर्व सामान जे आईने हजारदा उजळणी करून भरले असायचे. ते पायाशी ठेवून झोपायचो. जणूकाही कोणी चोरून नेणार आहे. डोळ्याला डोळा न लागणे हा वाक्यप्रचार त्या दिवशी तंतोतंत लागू पडायचा. मनात विविध विचार ,सहलीची सुखस्वप्ने सर्वात महत्वाचे म्हणजे एक अनामिक हुरहूर

 थोडक्यात नववधूची   पहिल्या रात्री  जीवाची घालमेल होत असेल. तशीच काहीशी हि अवस्था असायची. मग कधीतरी पहाटे आई उठावाची म्हणजे तिने अंगाला हात लावताच झटकन उठून मी तयार असायचो. तेव्हा "रोज असे अभ्यासाला उठायला काय जाते-" हे आईचे वाक्य मी कानाआड करायचो.

 पहाटेचा गार वारा आणि थंडीत शाळेच्या आवारात जमलेली मुल आजही हे दृश्य डोळ्यासमोर आले की अंगावर रोमांच उभे राहतात.
प्रत्यक्ष बस मध्ये  बसल्यावर ( येथे कोणी कोणाच्या   बाजुला बसायचे ह्याचा आराखडा आम्ही आधीच आखलेला असायचा. ) मग बस  सुरु झाल्यावर जय भवानी जय शिवाजी चा नारा ( शाळेवर संघाचा पगडा असला तरी शाखेत द्यायचो त्या घोषणा मात्र आम्ही येथे देत नसू ) संध्याकाळी भरपूर मस्ती दंगा करून संध्याकाळी बस परतीला लागायची. दमलेले  बहुतेक सर्व पेंगायला लागायचे. बस च्या हिरव्या ,जांभळ्या प्रकाशात संध्याकाळी झाडांना सर, सर मागे सोडत आमची बस डोंबिवली कडे मार्गस्थ व्हायची.
आता उद्या परत शाळा , अभ्यास मग मनोसोक्त  खेळायला ,बागडायला बंदी हे विचार मनाला अस्वस्थ करायचे. हा प्रवास कधीच संपू नसे असे मनापासून वाटायचे. 
 शाळेत आठवीला टक्यांची जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. तारुण्य सुलभ भावना ह्या वयपरत्वे येतात त्या ह्या स्पर्ध्धेच्या धगधगत्या अग्निकुंडात भस्मसात झाल्या होत्या. म्हणून कदाचित वर्गात कुठल्याही जोशीची कोणीही शिरोडकर नव्हती.
म्हणजे भले कोणी कितीही मनात मांडे खात असले तरी वास्तविक आयुष्यात इंच इंच भूमी लढवू ह्या न्यायाने एक एका मार्क मिळवून पहिल्या १० मध्ये येण्यासाठी हुशार मुलांची रेट रेस चालू असायची. ह्या नंबर गेम ची बाधा वर्गातील बहुतेक विद्यार्थ्यांना झाली होती. ह्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून    

९ विला  त्या काळात घरच्यांनी इरेला पेटून मला मुद्दाहून अत्यंत महागडा क्लास लावला होता. तेव्हा त्यांच्या अपेक्षेला पुरे पडलो नाही म्हणून मी स्वतःला वर्गापासून आणि स्वतःपासून पार अलिप्त केले होते. त्या काळात केबल वर दर गुरवारी ऑस्कर विनर सिनेमे दुपारचे विथ हिंदी सब टायटल असलेले दाखवायचे. युरोपियन ,अमेरिकन संस्कृती ,तेथील समाजजीवन ,हे पाहून मी दंग व्हायचो. जुना टायतेनिक पाहून मी ओक्साबोक्शी रडलो होतो. युरोपचे सुप्त आकर्षण माझ्या मनात तेव्हा निर्माण झाले.
शाळेची तेव्हा सहल राजस्थान येथे निघाली तेव्हा मनातील कमी मार्कांचे शल्य एवढे की मी त्या सहलीला न जाण्याचा माझ्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय घेतला. आज जर कधी वर्गातील मुलांचा कंपू जमला-

आणी रात्री शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला असता ह्या सहलीचा विषय हमखास निघतो. मी कावराबावरा होतो. मात्र माझे मित्र भरभरून ह्या सहलीचे अनुभव सांगत असतात. तेव्हा मी माझ्या आयुष्याचा एक मोठा निर्णय घेतला.
मन मारून जगायचे नाही.
किंवा बॉलीवूड च्या भाषेत सांगायचे तर "जिंदगी के सफर मी गुजर जाते वो मकान ,वो फिर नाही आते, वो फिर नही आते किंवा जिंदगी न मिले दोबारा"
अगदी हॉलीवूड च्य भाषेत संगाचे तर देअर नो पोईंत ऑफ लिविंग ,इफ यु कान्ट फील द लाइफ , ( वल्ड इज नॉट इनफ.) बॉंड मूवी.

 माझी शाळा आणी तिचे माझ्यावरच नाहि तर माझ्या सर्वच शाळेच्या वर्गमित्र आणि मैत्रिणींवर झालेले संस्कार एवढे गडद आहेत की आजही आभसी जगतात फेसबुक व ओर्कुट वर आमच्या शाळेची कम्युनिटी आहे आमच्या वर्गातील माझी आमटे ५ एक जण वगळता ह्या आभासी जगतात आम्ही आमचे शाळेचे पाश जोडून आहोत.आज शाळेचा माजी विद्यार्थी संघ उत्कृष रीत्या कार्यरत आहे. माझ्या इयत्तेतील मधुरा आणी निमिष आणी मा . वी . स च्या इतर मित्रांनी शाळेच्या ५ वर्षानंतर अथक परिश्रम घेऊन आमच्या १० अ १९९६ च्या वर्गाचे  री युनियन घडवून आणले. शिक्षण संपवून भारतचे कमवते नागरिक बनण्याच्या रेषेवर असतांना आम्ही सर्व शाळेच्या वर्गात जमलो. शिधये बाई आल्या होत्या.

वर्गातील सर्वांनी सुरवातीला स्वतःची  परत ओळख करून दिली. त्या नंतर शाळेतील खुपणार्या गोष्टी सांगा अशी एक अभिनव कल्पना मांडण्यात आली. आणि अतुल ने मोहिमेचा नारळ फोडला. -"१० विला वेगळ्या शिक्षिका असत्या तर चालले असते" अश्या अर्थी सूचक विधान करून वर्गातील सर्वांच्या मनातील सल त्याने व्यक्त केला. त्यानंतर अनेकांनी गमतीदार आठवणी सांगितल्या. मी माझ्या स्वभावाला अनुसरून उपस्थित बाईंचा वर्गातील तकिया कलाम अर्थात मुलांना उद्देशून " तुझे वय काय... तू करतो काय" हे त्यांच्या शैलीत म्हणून दाखवले आणी टाळ्या आणि हसे वसूल केले. सर्वांना ह्या प्रसंगी आज हयात नसणार्या संस्कृत हा विषय हरीतात्यांसारखा आवडीने शिकाविण्यार्या चांदे बाईंची आठवण आली.

 कर्क रोगावर उपचार चालू असतांना आमच्या दहावीच्या निकालाच्या दिवशी आमचे अभिनंदन करण्यासाठी त्या खास आल्या. तेच त्यांचे शेवटचे दर्शन ठरले.
.
आजही डोंबिवलीत दिवाळी पहाट साजरी करायला फडके रोड वर अवधी तरुणाई लोटते. तेव्हा काही वर्षापर्यंत हमखास आम्हाला वर्गातील मित्र मैत्रिणी भेटायच्या. आता बरेच जण डोंबिवलीच्या बाहेर हिरव्या देशात ( डॉलर देशी ) स्थिरावले आहेत. तर बरेच जण आखात , युरोपात मराठी बाणा मिरवत आहेत. अनेकांनी तर पुण्य नगरी आपले बस्तान बसविले आहे. तर खूप जणांनी आपल्या मुंबापुरी मधील मोठ्या उंच इमारतीत आपले बस्तान बसविले आहे. त्यांचे वर्णन मी उंच त्यांचा झोका असे गमतीने करतो.
 चेहरा पुस्तकाच्या माध्यमातून आंम्ही संपर्कात आहोत पण एकदिवस आयुष्यात आम्ही परत एकदा स्नेह संमेलन भरवू ही    आशा मी मनी बाळगून आहे.

आजही शाळा माझ्या स्वप्नात येते. मारकुट्या पेणकर आणि शिंदे बाई
किंवा टोपण नावांनी सर्वांना बोलावणाऱ्या दिवेकर बाई. माझ्या आवडत्या बाई ज्या माझ्या जणू मैत्रिणी होत्या ज्यांच्यापुढे मनातील सल किंवा आनंद मी व्यक्त करायचो अश्या अंतूलकर , सुदामे ,कुलकर्णी ,खाडिलकर बाई
माझ्या असामाजिक कृत्यांचा पंचनामा करणाऱ्या प्राथमिक च्या   प्रभुणे आणी  माध्यमिकच्या महाबळेश्वरकर ह्या मुख्यध्यापिका ज्याच्या खोलीत गेल्यावर ह्या  नाट्यपदाची प्रकर्षाने जाणीव व्हायची. हे सर्व त्या स्वप्नाचे घटक असतात. दुर्दैवाने ही स्वप्ने पहाटेला कधीच पडत नाहित.
मग कधीतरी कागज की कश्ती कानावर पडले. की एक दीर्घ निश्वास सोडणे एवढेच माझ्या हाती असते.




५ टिप्पण्या :

  1. छानच लिहिलेय निनादराव. ओघवते कथानक, आणि खूप काही.
    जाम गंमत आली वाचताना. -पराग

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद पराग
    शाळा ह्या विषयावर कादंबरी होईल इतक्या आठवणी आहेत.
    पण आठवी नंतर शालांत परीक्षा हेच अंतिम ध्येय मानल्या गेलेल्या आमच्या वर्गात मुले आणि मुली एकमेकांशी बोलत नसू म्हणजे सातवी पर्यंत सगळेच नॉर्मल असायचे पण पुढे काय भट्टी बिघडली हेच कळत नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. नमस्कार,

    निनाद कुलकर्णी आपला शाळा लेख वाचुन आमच्या (आपल्या) जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या ,तसेही इथे सध्या मुंबईत शाळा सिनेमाचा फिव्हर जोरात आहे ना

    आणि आपल्या म्हणजे आपण एकाच शाळेतले तुम्ही राणाप्रताप आणि आम्ही दत्तनगर
    मी दहावी १९९५ साली पास झालो ..

    आपण कधि झालात

    keep in touch

    दत्तप्रसाद बेंद्रे

    उत्तर द्याहटवा
  4. मी १९९६ साली शाळांत परीक्षा उत्तीर्ण झालो.
    मला स्वतःला दत्ता नगर ला असलेल्या स्वतंत्र मैदानाचा खूप हेवा वाटायचा.
    अभिनेत्री नारकर ह्या तुमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी
    त्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या अभिनयाला वाव काळे बाईंनी दिल्याचा उल्लेख केला होता.
    त्या पुढे आमच्या शाळेत आल्या पण आम्ही अ वर्गात असल्याने त्या आमच्या नशिबी शिकवायला नव्हत्या.
    दत्त नगर मध्ये ८ वी नंतर विज्ञान विषय इंग्रजीत शिकवला ज्यायचा,
    आणि ह्या कारणास्तव माझ्या घरच्यांनी मला मी पूर्वेला राहत असल्याने तेथे पाठविण्याचे कुटील कारस्थान रचले.
    असे माझे त्यावेळी मत होते. मात्र राणाप्रताप ची ओढ आणि बालमित्रांचा सहवास
    ह्यामुळे मी निर्धाराने राणाप्रताप मध्ये राहिलो.
    आता वाटते दत्त नगर मध्ये आलो असतो तर काही बिघडले नसते.
    निदान तुमच्या मैदानाला माझे पाय तरी लागले असते.

    उत्तर द्याहटवा
  5. अरे वा दत्तनगर बद्दल असलेला ओढ आवडली ,आणि होते ही तसेच पुर्ण ८ ही शाखांत दत्तनगर ला मैदान मोठे होते,

    माझी काकु पण राणाप्रताप भवन ला शिकावायला होती (बेंद्रे बाई )

    आणि काळेबाई तर दत्तनगर ची शान

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips