हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, १४ मे, २०१२

फेसाळणाऱ्या बिअरसाठी उसळणारा जनसागर ( भाग १)ऑक्टोबर फेस्ट


म्युनिकमध्ये येऊन मला एक वर्ष झाले. आल्यापासून उत्कंठेने वाट पाहात होतो ऑक्टोबर महिन्याची. कारण याच महिन्यात आयोजित करण्यात येतो जगविख्यात 'ऑक्टोबर फेस्ट' अर्थात बिअर फेस्टिव्हल. केवळ जर्मनीतूनच नाही, तर जगातून बिअर चाहत्यांची म्युनिकच्या दिशेने वाटचाल चालू असते.

जगातील हा सर्वात मोठा सोहळा समजला जातो. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटचा व ऑक्टोबरचा पहिला, असे दोन आठवडे चालणाऱ्या या सोहळ्यात जगभरातून ६५ लाख लोक आवर्जून हजेरी लावतात.

दिवसाला किमान ५ लाख माणसे येथे हजेरी लावतात. आम्ही गेलो तेव्हा सुद्धा तोबा गर्दी होती.



जर्मनीमध्ये (जर्मन भाषेत डॉईशलेंड) बव्हेरिया हे सर्वात मोठे राज्य. त्याची राजधानी म्युनिक आणि या शहरात पारंपरिक बव्हेरियन संस्कृती जपणाऱ्या या सोहळ्याला २०० वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. १२ ऑक्टोबर १८१० मध्ये बव्हेरियाचा राजा लुडविक यांचा विवाह राजकन्या थेरेसा हिच्याशी झाला. या विवाह सोहळ्याचा एक भाग म्हणून म्युनिकवासियांना शहराच्या मध्यवर्ती पटांगणावर हा राजेशाही सोहळा साजरा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. काळाच्या ओघात या भव्य मैदानाचे नामकरण राणीच्या आदरार्थ थेरेसिएन्विस असे करण्यात आले. आजतागायत त्याच ठिकाणी हा सोहळा पार पडतो. १९६० नंतर परदेशी पर्यटक या सोहळ्यात सहभागी होऊ लागले. त्यात ७२ टक्के लोक बव्हेरिया प्रांतातून येतात तर १५ टक्के युरोपीय समुदायातून येतात. उर्वरित पर्यटकांमध्ये प्रामुख्याने अमेरिका आणि अन्य देशांतून येतात.

हा सोहळा १०३. ७८ एकर इतक्या मोठ्या मैदानावर भरतो. ती एक मोठी जत्राच असते. मैदानावर १४ विशाल तंबू उभारले जातात. त्यांची नावे या तंबूंमध्ये मिळणाऱ्या बिअरच्या नावावर ठेवण्यात आली असतात. जर्मनीत बिअर हे जणू  राष्ट्रीय पेय समजले जाते. बाटलीबंद पाण्यापेक्षा येथे बिअर स्वस्त मिळते. दोन मजली टोलेजंग अत्यंत पारंपरिक आणि प्राचीन बिअर गार्डन म्युनिक शहराचे प्रमुख सांस्कृतिक वैशिष्ट्य समजले जाते. (पर्यटकाच्या यादीत ते अग्रस्थानी असतात).

जर्मनीमधील प्रत्येक लहान-मोठ्या शहरांमध्ये स्वतःची एक बिअरची ब्रुअरी असते. मोठ्या शहरांत तर ४ ते ५ बिअर ब्रुअरी  असतात. ऑक्टोबरफेस्टमध्ये प्रामुख्याने म्युनिक बिअर मिळते आणि तंबूमध्ये केवळ बिअरच विकली जाते. तंबूत प्रामुख्याने आरक्षण केलेल्यांनाच प्रवेश दिला जातो. जगभरातील पर्यटक सहा महिने आधीच त्यांची नोंदणी करत असल्यामुळे ते हाउसफुल्ल होतात. प्रत्येक तंबूत किमान ७००० लोक बसू शकतात. एकूण सर्व तंबूंमध्ये एकत्रितपणे एक लाख लोक एकाच वेळी बसू शकतात. ज्यांना तंबूत जागा मिळत नाही, ते तंबू़बाहेर ठेवलेल्या छोट्या ठेल्यांवर डेरा जमवतात. तंबूत पारंपरिक बायरिश संगीताच्या वाद्यवृंदाच्या तालावर बिअरप्राशन सोहळा रंगतो. बायरिश संस्कृती ही इतर जर्मन संस्कृतीपेक्षा थोडी हटके आहे. बायरिश लोकांना त्यांचा प्रचंड अभिमान आहे. बायर्न राज्यात परप्रांतीय (इतर राज्यातील जर्मन व परदेशी लोक) दीर्घकाळ वास्तव्यास आले, की त्यांना बायरिश संस्कृतीत समरस करून घेण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. येथे बिअरचा मग हा एक लिटरचा असतो. त्याला मास म्हणतात. इथे येणारा प्रत्येक माणूस किमान २ ते ४ मास बिअर सहज रिचवतो.
एक लिटर चा एक असे ९ म्हणजे ९ लिटर चे ग्लास लीलया उचलणारी आर्य कन्या 



(यांच्या संस्कृतीत समरस होण्याचा मार्ग सोमरसातून जातो हे समजल्यावर मी देखील त्यात समरसून सहभागी झालो).
सकाळी दहा वाजता उघडलेले तंबू रात्री बारापर्यंत चालू असतात. पहिले सत्र दहा ते सायंकाळी ५ पर्यत आणि दुसरे सत्र सायंकाळी ५ ते मध्यरात्रीपर्यत चालू असते. आरक्षणही दोन सत्रांमध्ये केले जाते. खाण्यासाठी डार्क बिअरमध्ये मुरवलेली कोंबडी  आणि वराहाचे सॉसेज किंवा स्टेक हे पारंपरिक जर्मन खाद्यपदार्थ मेन कोर्समध्ये असतात. त्याच्या जोडीला सौर्क्रौत (जर्मन कोबीचे सलाड) असते. काही हटके खायचे असेल, तर हासेनफेफर म्हणजेच सशाचा स्टेक, तर शाकाहारी मंडळींसाठी येथे बव्हेरिया संस्कारित बटाट्याचे सलाड, कासेप्लाझ (मॅक्रोनी आणि चीजचा बव्हेरियन अवतार),  रोस्टी (कांदे आणि बटरमध्ये तळलेले बटाट्याचे पॅनकेक) अशी माफक सोय उपलब्ध असते. ओक्षेन बेताराय या तंबूत खास ग्रिल्ड व्हेजिटेबल पदार्थ मिळतात. डेझर्ट म्हणून ब्लॅक फोरेस्ट प्रांतामधील तोंडात ठेवताच विरघळणारा जगप्रसिद्ध ब्लॅक फोरेस्ट केक हे प्रमुख आकर्षण असते. फेस्टमधील प्रमुख तंबूंची नावे व वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -
) श्कोटेनहॅमेल टेंट - १८६७ मध्ये सुरु झालेला हा सर्वात जुना तंबू. सोहळ्याची सुरवात ठीक दुपारी बारा वाजता म्युनिकचे महापौर याच तंबूत बिअरचा लाकडी बुधला फोडून करतात. दहा हजार आसन व्यवस्था असणाऱ्या या तंबूत प्रामुख्याने तरुणाईची प्रचंड गर्दी असते).

२) हिप्पोड्रोम - आधुनिकतेचे वारे लागलेला या तंबूमध्ये काळानुसार अनेक बदल झाले आहेत. आधुनिक अमेरिकी संगीत आणि जोडीला सैदैव उपलब्ध असलेल्या स्केटमुळे (वाईन) स्थानिक सेलिब्रिटींची येथे वर्दळ असते.
तंबू मधील दृश्य

३) हॉफब्राउ - म्युनिकमधील ही जुनी ब्रुअरी असून, त्यात पारंपरिक बव्हेरियन वेशभूषा करावी लागते. पुरुषांसाठी लेदर होजेन  (म्हशीच्या चामड्याची विजार आणि बूट) त्यावर पांढरा झगा, तर महिलांना दिर्न्डेल (पायघोळ झगा) घालावा लागतो. त्याची किंमत साधारण १५० ते ३५० युरो असते. पारंपरिक वेष विकणारी आणि १०० वर्षांपासून चालू असलेली दुकाने म्युनिकमध्ये आहेत. इंटरनेटवरूनही हे कपडे खरेदी करता येतात. फेस्टमधील ८० टक्के लोक याच वेशभूषेत असतात. आम्हीही हौसेने या कपड्यांची खरेदी केली. प्रामुख्याने परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या तंबूत अनेकदा अमेरिकन आणि इटालियन नागरिकही दिसतात).
मी व माझी पत्नी कथारिना ह्यांनी टिपिकल बायरिश झगा परिधान केला होता. 



४) ऑगस्टीनर - हा देखिल म्युनिकमध्ये प्रसिद्ध असलेल्या बिअर उत्पादकाचा तंबू आहे. म्युनिवासियांच्या मते तो सर्वोत्तम असून, तेथील बाल दिन हे त्यांचे प्रमुख आकर्षण आहे. या दिवशी बच्चेकंपनी आपल्या आई-वडिलांसोबत खूप धम्माल करतात. रात्री आठनंतर मुलांना तंबूत थाबण्याची परवानगी नाही).
विशाल तंबुमधील  तळीराम पंथीय साधारण काही हजार 


५) हॅकर - त्याच नावाची बिअर असलेला हा सर्वात मोठा तंबू. त्यात १० हजार लोक बसू शकतात. बायरिश ध्वजामध्ये निळे आकाश व पांढरे ढग असल्यामुळे या तंबूचे छत निळ्या आणि पांढऱ्या कापडाचे असते. म्हणूनच या तंबूला बायरिश हेवन म्हटले जाते).

7) कॅफर्स वीसन् शँके - हा राजेशाही तंबू असतो. त्यात जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती हजेरी लावतात. ३ हजार लोक बसतील असा हा सर्वात छोटा तंबू. गौरमेट फूड म्हणजेच डेलिकेसी खाद्यपदार्थांचे येथील प्रमुख आकर्षण असते).
सूर्य नारायणाला मी  २ मास चे अर्ध्य  दिले  आणि  तंबू  बाहेर मोकळी हवा खाण्यासाठी क्षणभर विश्रांती घेण्यासाठी  बाहेर आलो.
तेव्हा घेतलेली आमची छबी

क्रमशः

३ टिप्पण्या :

  1. 'यांच्या संस्कृतीत समरस होण्याचा मार्ग सोमरसातून जातो हे समजल्यावर मी देखील त्यात समरसून सहभागी झालो'
    -एकदम चाबूक वाक्य! खल्लास माझ्या मित्रा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आणखी एक म्हणजे... सख्या, ऑक्टोबर तर दूर आहे पण त्याच जागेवर भरणाऱ्या वसंतातल्या सणाला (२० एप्रिल ते ०५ मे) हजेरी लावलीस कि नाही? तो मूळ सणाची छोटी प्रतिकृतीच असते, पण ऑक्टोबर ची सर त्याला नाही हे नक्की. बाकी क्या पिनेवालोंको...

      हटवा
  2. @पराग
    दर्दैवाने एप्रिल मध्ये तेथे जाण्याची संधी मिळाली नाही. व सलग ३ वर्ष माझी भारतातील दिवाळी सुद्धा मिस होत आहे.
    आता दिवाळीची सर ह्या सोहळ्याने भरून जरी काढता आली नाही. तरी आपले दुधाची तहान ताकावर .
    बाकी पिनेवालोंको ......

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips