हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, २ जानेवारी, २०१३

दास्ताने हिंदुस्तान भाग २ ( सिटी ऑफ लेक उदयपूर

भ्रमंती करणे म्हणजे आपल्या नेहमीच्या कूपमंडूक जगातून बाहेर येऊन जगातील विशाल अथांग समुद्रात भेटणारी कलंदर व्यक्तिमत्व व अनुभव हे आपले अनुभव विश्व तर समृद्ध करतातच  पण आपल्या वैचारिक कक्षा  रुंदावत जातात.  आपल्या जाणिवा प्रगल्भ होतात.म्हणून प्रवास करावा असे मला नेहमीच मनापासून वाटते.   तर आमची टुर निघाली. त्यात आलेले विलक्षण , विलोभनीय , अतुलनीय , प्रेक्षणीय , मधाळ , तर काही कटू अनुभवा सह पेश  हे टुर टुर


--------------------------------------------------------------------------------



उदयपूर शहराला   व्हेनिस  शहराची उपमा देण्यात आली आहे. कारण हे शहर तलावांच्या साथही प्रसिद्ध आहे.
उदयपूर शहराच्या भटकंतीची सुरुवात   



तलावांचे शहर म्हणून विख्यात असलेले उदयपूर मधील सर्वात प्रसिद्ध तलाव म्हणजे लेक पिचोलीया पासून झाली.

 
मानवनिर्मित हा तलाव सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच महाराणा उदय सिंह द्वितीय ह्यांनी बांधला होता. तलावाच्या दुतर्फा टेकड्या, मंदिर, हवेल्या आणि  सिटी पॅलेस आहे. तलावाची खोली जास्त नसून त्यातील दोन बेटांवर त्यावरील असलेल्या दोन मोठ्या महालांचे मोठ्या हॉटेलात रुपांतर झाले आहे . १) जग निवास म्हणजेच लेक पॅलेस २) जग मंदिर लेक पॅलेस.
 १७व्या शतकात महाराणा जगत सिंह द्वितीय हे आपल्या राण्यांना, मैत्रिणी अगर अंगवस्त्रे ( ह्याबाबत नक्की माहिती नाही.) अश्या लवाजमा घेउन जग मंदिर च्या महालात म्हणजे त्या बेटावर विहार करत असत. त्यांच्या वडलांना हे कळले आणि तेथे जायची वाट बंद झाल्याने कालांतराने त्यांनी ह्याच तलावातील दुसर्‍या बेटावर आगऱ्याचा तत्कालीन शुभ्र संगमरवरी बांधकाम शैलीवर आधारित एक अवर्णनीय महाल बांधला.

 जग निवास महाल म्हणून ख्याती पावलेला हा महाल कालांतराने लेक पॅलेस म्हणून ओळखला जाऊ लागला. ८० च्या दशकात ऑक्टोपसी ह्या बॉण्ड पटाचे बहुतांशी चित्रीकरण येथे झाले होते.प्रतिमा बेदी ह्यांच्या आत्मचरित्रात ह्या सिनेमाच्या निमित्ताने परवीन बाबी पासून दुरावलेला कबीर आणि त्या कसे परत एकदा जवळ आल्या. आणि ह्या महालातील चित्रीकरणाच्या सुखद आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. १९५९ साली ह्या महालाचे रिसोर्ट मध्ये रुपांतर करण्यात आले. आणि ७० च्या दशकात ताज ग्रुप ने येथे जगातील खऱ्या अर्थाने राजेशाही हॉटेल बांधले. ताज मध्ये कॉलेज जीवनात उमेदवारी करतांना त्यांच्या बुक लेट मध्ये ह्या रिसोर्ट चा समग्र सचित्र इतिहास पाहून आयुष्यात एकदा तरी ह्या वास्तूत जायला मिळावे अशी मनीषा  होती.


 सहा महिन्यापूर्वी बुकींग केल्यामुळे तेथील उपाहारगृहात दोघांसाठी एक संध्याकाळ आरक्षित करण्यात आली. दोघांचा कव्हर  चार्ज फक्त २७०० रुपये. आणि रक्त वारुणी आणि इतर पेय, बक्षिसी असे सर्व मिळून हा आकडा ५ हजारापर्यंत गेला. त्या वास्तुच्या सानिध्यात चंद्रप्रकाशात सचैल स्नान करत अवीट गोडीचे जेवण आणि त्यास साजेसे आदरातिथ्य ह्या गोष्टी जमा धरल्यास ५००० हजाराचे ते कागद आयुष्यभर गाठीशी राहीन अश्या  अनुभवाच्या मानाने  अगदीच तोकडे वाटतात. महालाचे दर्शन घेण्याचा योग आमच्या नशिबी नव्हता. आयुष्यात कधी बक्कल पैका गाठीशी आला तर ७० खोल्यांच्या ह्या महालात जो अनेक कोर्ट यार्ड, तलावा चे मनोरम दृश्य दाखविणाऱ्या गच्च्या व राजेशाही दालनांची समृद्ध आहे तेथे काही दिवस श्रमपरिहारासाठी उतरणे मी पसंद करेन.

 लेक पॅलेस दुसऱ्या बेटावर १५५१ साली बांधायला घेतलेल्या जग जग मंदिर महालाचे काम १६५२ मध्ये पूर्णत्वास गेले.सध्या तेथे सुद्धा लीला ग्रुप चे मोठे रिसोर्ट आहे. पण मुळात ह्या महालाची रचना राज परिवाराच्या उन्हाळ्यातील सुट्या आणि मोठ्या मेजवान्या आयोजित करण्यासाठी बांधल्याने मूळ संकल्पनेला तडा न जाऊ देता लीला रिसोर्ट येथे भव्य जलसे आणि लग्नाचे राजेशाही सोहळे पार पडते. एक महिन्यापूर्वी शकिरा येथे एक खाजगी जलसा करून गेली. तर रविना टंडन ला ती पूर्वाश्रमीची रजपूत राजकन्या असल्याचे स्वप्न पडले म्हणून थडानी ह्या सिनेवितरक असलेल्या तिच्या नवऱ्याच्या खिशाला भुर्दंड बसला नि त्यांच्या लग्नाचे सूप येथे वाजले. जग मंदिराच्या     च्या भव्य महालात.


 ..दुसर्‍या दिवशी न्याहारी साठी अस्सल राजस्थानी धाब्यावर गेलो. तेथे मिसळी ला महाराष्ट्रात जे स्थान आहे तेच स्थान राजस्थान असलेल्या शेव कचोरी चटणी सोबत खाऊन तृप्त झालो. राजस्थानी भटाचा चहा आणि त्याची चव जरी नवी नसली , तरी शर्करेचा सढळ हस्ते वापर हि नवीन गोष्ट त्या चवीत अंतर्भूत झाली.
ह्या बहिणीच्या साठी      महत्प्रयासाने सी सी डी शोधून काढले. पण तेथील अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे प्रचंड नंतर अत्यंत बेचव कॉफी पिऊन   त्या बहिणींचा मूड गेला.

 मात्र तेथून सिटी पॅलेस जवळील प्राचीन जगदीश मंदिर व तेथील अर्वाचीन शिल्पकला पाहून त्या तृप्त झाल्या

. महाराणा जगत सिंह ह्यांनी सोळाव्या शतकात तीन मजली हे लक्ष्मी नारायणा चे मंदिर बांधले. ह्याचे मुळनाव जगन्नाथ पुरी होते पण आता जगदीश जी चे मंदिर असे म्हणतात.


मंदिराच्या सुरवातीला दोन अजस्र गजराजाचे मूर्ती  खांब आपले लक्ष वेधून घेतात. थोडे पिरेमिड सारखे दिसणारे हे मंदिर आपल्या वास्तूशास्त्रानुसार   बांधले आहेत.पायऱ्या चढून वर गेल्यावर पहिले लक्ष विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाची ब्रास च्या अत्यंत देखण्या मूर्तीकडे गेले. अर्धा मनुष्य व अर्धा गरुड असलेली हि मूर्ती आपला एक आब राखून होती.


 मंदिराची रचना इंडो आर्यन पद्धतीच्या नुसार केली आहे


. येथे संपूर्ण राजस्थान दौऱ्यात मंदिर पाहत असतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि भावली की ह्या मंदिरातील पुजारी विदेशी पर्यटक आले कि त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधून त्यांना रसाळ वाणीत मंदिर विषयी माहिती देतात. त्यांच्या शंकांचे निरसन करतात. अर्थात त्यांना भरपूर बिदागी देखील मिळते. विदेशी प्रवासी आपल्या सारखे भक्ती भाव ठेवून मंदिर पाहत नाही. त्यांना उत्सुकता मंदिराची बांधणी त्यामागील इतिहास व त्यायोगे आपल्या संस्कृतीची सखोल माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा असते. म्हणूनच कि काय मंदिराच्या भव्य मंडपात माझे आईवडील व मी आरती चालू असतांना तल्लीन झालो होतो. तर ह्या बहिणी मात्र मंदिराच्या गाभ्याची रचना न्याहाळत हो त्या. त्यांच्या मनातील शंकांचे तेथील पुजाऱ्याने अत्यंत सुरेख निरसन केले.त्याने सांगितले कि ह्या मंदिराकडे तुम्ही निरखून पहिले तर असे वाटेल कि कोणी पद्मासन घालून ध्यानाला बसले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही इंडो आर्यन धाटणीच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृती व त्यांची मुल्ये दिसून येतात. आणि त्यांच्या नक्षी कामात एक सुसूत्रता आढळून येते. उदा वरील चित्रात पहा. सगळ्यात तळाशी राक्षस ,डिमोन आढळून येतात कारण त्यांचे वास्तव्य पाताळात असते. दुसऱ्या लेव्हल मध्ये प्राणी त्यातही अश्व आणि हत्ती आढळून येतात. कारण प्राण्यांशी आमच्या संस्कृतीची नाळ जोडल्या गेली आहे. तिसऱ्या लेव्हल मध्ये प्राणी आणि मनुष्य एकत्र दाखवले आहेत. तर चौथ्या लेव्हल वर गंधर्व ,अप्सरा ,यक्ष ,किन्नर ह्यांना स्थान दिले असून देवांचे मनोरंजन हे त्यांचे कार्य असते. सरत शेवटी मंदिराच्या कळसावर देवाची प्रतिमा असते. ह्या मंदिराच्या कळसा-च्या येथे ब्रम्हा ,विष्णू , महेश ह्या त्रीमुर्तींची शिल्पे आहेत.






 भारावलेल्या अवस्थेत आम्ही जवळील एका स्थानिक उपाहारगृहात जाऊन जेवण केले. येथील छोले भटुरे राजस्थानी मसाल्यात एका वेगळ्याच चवीचे बनले होते. पण ह्या बहिणीचं भारतीय जेवणाचा हेंग ओव्हर वर उतारा म्हणून   us   पिझ्झा ह्या उपाहारगृहात गेल्या व संतुष्ट झाल्या. बेंगळूर येथे सुरु झालेल्या व भारतातील नंबर १ पिझ्झा अशी जाहिरात करणारी हि साखळी दक्षिण भारतासोबत आता उर्वरित भारतात सुद्धा प्रवेश करत आहे. डॉमिनोज ला येत्या काळात कडवी टक्कर मिळणार अशी खात्री पिझ्झा चा एक तुकडा तोंडात टाकल्या सरशी झाली. आता आम्ही सहली कि बाडी कडे कूच केले.

उदयपूर मधील प्रसिद्ध फतेहपुर लेक जवळ हि बाडी आहे. राणा ह्यांचा अर्थ राजा , नृप ,भूपती हा आहे. म्हणून जसे आपण महाराजा म्हणतो तसे हे रजपूत महाराणा म्हणतात. तर अश्याच एका महाराजाच्या लग्नात राजकन्येच्या सोबत ४८ दास्या हुंडा म्हणून आल्या. त्या काळी दासी हि राणीची अर्धवेळ मैत्रीण समजली जायची. तर राणी आणि तिच्या दास्या ह्या त्या काळात त्यांच्यावर असलेल्या सामाजिक बंधनामुळे व राजेशाही संदेशानुसार सार्वजनिक उद्यानात फिरू शकत नव्हत्या. म्हणून राजाने त्यांच्या मनोरंजन , आणि फिरण्यासाठी मोठ्या हौसेने हि सहेली कि बाडी बनवली. हि बाडी म्हणजे छोटेखानी उद्यान असून येथे एकेकाळी २००० कारंजी होती.


 . त्या काळात म्हणजे १६ व्या शतकात पंप नसल्याने गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्यांची रचना केली होती. तेथे असलेले संगमरवरी हत्तीची मूर्ती हि एकाच दगडातून कोरल्याचे गेली होती. म्हणजे एका अखंड शिळेतून मूर्ती साकारताना जमिनीखालून पाण्याच्या पुरवठा होऊन ते पाणी मूर्तीच्या सोंडेतून कसे येते हे आजतागायत एक कोडे आहे. उद्यानात सर्वत्र पाण्याचे फवारे उडत असल्याने पाऊस पडतांना होणारा नाद ध्वनी आमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करत होत्या. एकेकाळी आपण किती प्रगत होतो. ह्याची जाणीव येथे मला झाली. त्या बहिणी तर काय बरे लॉजिक असेल ह्या मागे ह्यावर मंथन करत हो त्या. नंतर मोर्चा फतेहसागर लेक कडे निघाला. प्रत्यक्ष लेक एवढा काही प्रेक्षणीय आम्हाला वाटले नाही.
 माझ्या डोक्यात उगाचच  कुलकर्ण्यांच्या   ममताचे  मुझको राणाजी माफ करना
हे गाणे पिंगा घालत होते.



. आणि उन्हामुळे अंगाची लाही लाही झाल्यामुळे आम्ही गाडीतूनच त्याचे दर्शन घेतले. मुळात गेल्या दोन दिवसात प्रेक्षणीय ह्या शब्दाचा अर्थ व तो वापरण्यासाठी आमचे निकष कमालीचे बदलले होते. प्रत्यक्षात हा लेक  उदयपूर मधील सर्वात दर्शनीय असल्याचे आमच्या वाहन चालकाने सांगितले. आम्ही आता अल्पोपाहार करावा ह्या हेतूने मूळ शहराच्या बाजारात आलो. नि एका मिठाई च्या दुकानात शिरलो. येथे शेकड्याने मिठाई ची दुकाने होती. आम्ही चहा आणि मग गरम गरम गुलाब जाम च्या प्रत्येकी दोन वाट्या फस्त केल्या. ह्या तोडीचा गुलाबजाम मुंबईत फक्त सायनच्या गुरुकृपा मध्ये मिळतो. आजही तोंडात टाकताच विरघळणारा आणि आमची रसना असीम आनंदाने तृप्त करणाऱ्या त्या गुलाबजामच्या आठवणीने मन व्याकूळ होतो. बहुदा कातरवेळी तो खाल्ला म्हणून ओघाने मन व्याकूळ होणे आले.

 आता संध्याकाळी प्रसिद्ध सन सेट पाहून दुसऱ्या दिवशी पुढचा थांबा म्हणजे रणक पूर येथील जैनांचे मंदिर पाहणे हा होता. हे मंदिर पाहून आमचा कडे वर्णन करायला शब्द नव्हते. ह्याहून सुंदर मंदिर आम्ही आमच्या आयुष्यात पहिले नव्हते. कोणतीही कंजूषी न करता हे सौंदर्य आम्ही चित्र बद्ध केले/


.  क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips