प्रथम तुला वंदितो ह्या गाण्यांसोबत पार्वतीच्या बाळा व चिक मोत्याची माळ अशी विविध वर्गात लोकप्रिय बाप्पाची गाणी दिवसभर सार्वजनिक मंडपात दिवसभर लावली जात. आज गणरायाची हि गाणी कानावर अनेक वर्ष कानावरून गेली असल्याने आता परदेशात नीरव शांततेत नुसते डोळे जरी मिटले तरी तो मंडप , त्याभोवती असणारे कार्यकर्ते , गुलाल अबीर ह्यांची रंगसंगती डोळ्यासमोर येते , लहान मुले अवती भोवती बागडताना दिसतात. मंडपाच्या मध्यभागी गणेशाची मूर्ती दिसते.
सार्वजनिक मंडळे त्यांचे झालेले व्यापारीकरण हे अपरिहार्य आहे. मात्र ह्याच मंडपातून अनेक तरुण मोफत इवेंट व्यवस्थापनाचे धडे गिरवतात. शिस्त , नेतृत्व , समन्वय असे अनेक गुण आपसूकच अंगवळणी पडतात. त्याचा पुढे आयुष्यात फार उपयोग होतो.
दरवर्षी दिवाळी किंवा गणपती ह्यापैकी एक सण भारतात साजरा करायचा असे नववर्षाला बेत आखले जातात पण ...
असो
माझ्या बालपणी डोंबिवलीहून खास ह्या दोन सणांसाठी माझे आजोबा मला मुंबईच्या बटाट्याच्या चाळीत आणत.
तेथे घराघरात म्हटली जाणार्या आरत्या आजहि माझ्या तोंडपाठ आहेत , व जेव्हा कधी त्या म्हणायची वेळ येते तेव्हा आपसूकच त्या ओठावर येतात. त्यासाठी कधीही घोकंपट्टी करावी लागली नाही ,
आज बायकोचा वाढदिवस कदाचित विस्मरणात जाण्याची शक्यता असते , महत्वाचे पासवर्ड ऐनवेळी स्मृती पटलाहून अंतर्धान पाऊ शकतात पण ह्या आरत्या ,गणपतीची स्तोत्रे मात्र माझ्या सोबत नेहमीच असतात.
काही महिन्यापूर्वी माझा जर्मनी मधील मित्र पराग धरमाधिकारी च्या घरी संध्याकाळच्या सुमारास गेलो तेव्हा सात वाजता त्याचा मुलगा समर्थ व तो परवचा व अथर्वशीर्ष म्हणायला सुरवात केली , एक क्षण वाटले शाळेत व बालपणी म्हटलेले आता कसे आठवणार
मात्र सुरवात होताच तोंडातून स्वर आपसूकच उपटू लागले.
तेव्हा कुठेतरी जाणीव झाली ह्या गोष्टी पार माझ्या आत्म्यात एकजीव झाल्या आहेत.
गणपती कडे काही मागणे मी कधीच सोडून दिले आहे ,
मला काही हवे आहे म्हणून तुझी आराधना मी करत नाही ,
तू गावाला चालला की मला चैन पडता नाही , म्हणून तुझी मी जेव्हा तू माझ्या घरी येतो तेव्हा तुझी सरबराई करतो.
तू सुखकर्ता व दुखहर्ता आहे ,
माझ्या आयुष्यात सुख व दुख हे तूच आणतो ,
मी मागून , नवस करून त्यात काहीही बदल होणे नाही ,
तू माझी नियती ठरवली आहे. तुझ्यावर माझा विश्वास आहे ,
तू दिलेली सुख व दुक्ख मेरे सर आखोपे
आज लंडन मध्ये माझे मित्र तुझी रत्यावर मुंबई च्या धाटणीची मिरवणूक काढतात , नाचतात , लंडनच्या बॉबी ला सुद्धा तुझे अप्रूप वाटते ,
साला त्याचा हेवा वाटतो ,
भारतात नाही जाता आले तरी एक एक दाव लंडन ला नक्कीच जायचे असे बेत मनात शिजतात.
नित्यनियमाने केबल वर लागणारा अष्टविनायक सिनेमा
पाहणे तेव्हा मग बाबांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगणे
म्हणजे त्यांचे लग्न डोंबिवलीत पूर्व ब्राह्मण सभेत झाले ,त्यावेळी १९७९ साली अष्टविनायक सिनेमा तुफान चालला होता. डोंबिवलीत टिळक ला सगळे शो हाऊसफुल्ल चालले होते ,
आईबाबांना मात्र लग्नाच्या गडबडीत हा सिनेमा काही पाहता येत नव्हते , अर्थात त्याकाळी सिनेमे गाजले की २५ आठवडे पडद्यावर डेरा टाकून असायचे. पण मुंबईतील आमच्या बटाट्याच्या चाळीतील हौशी मंडळीनी खास डोंबिवलीत येउन ३७ तिकीट काढून ठेवली होती , व बाबांचे लग्न लागल्यावर सगळे चाळकरी खास शिनेमा पाहायला गेले , व जातांना बाबांना सांगून गेले व सिनेमा पाहून झाल्यावर रिसेप्शन चे आइसक्रीम खायला जातीने हजर व सिनेमाचे भरभरून कौतुक
आईबाबांना कधी एकदा हा सिनेमा पाहतो असे झाले होते ,
मग लगेच त्याच आठवड्यात सिनेमा पहिला गेला व मग अष्टविनायक यात्रा सुद्धा करून झाली.
दरवर्षी हीच हरिदासाची कथा बाबांकडून ऐकणे आज प्रकर्षाने जाणवते , आजही केबल वर अष्टविनायक लागला असेल ,मात्र बाबांची गोष्ट ऐकायला मी नसेन.
अजून काय लिहू
आता मुंबईत माझ्या घरी आरती सुरु होईल तेव्हा आई
स्मार्ट फोन वरून ती येथे मला जर्मनीत दाखवेल.
हि विज्ञानाची किमया तुझीच
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा